मुंबई : पार्किंगच्या वादातून मुजोर कारचालकाने शेजाऱ्याची दुचाकी चिरडल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. मुंबईतील पवईसारख्या उच्चभ्रू भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.


पवईतील 'जलवायू विहार' या उच्चभ्रू परिसरात नऊ सप्टेंबरला घडलेली घटना कॅमेरात कैद झाली आहे. इनोव्हा कार चालक स्कूटरला मुद्दाम चिरडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा वाद सुरु झाला गाडी पार्क करण्यावरुन.

रवींद्र पवार यांनी आपल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी स्कूटी पार्क केली आणि ते निघून गेले. त्याच वेळी विजय नावाचा इसम आपली इनोव्हा कार घेऊन तिथे आला. आपल्या नेहमीच्या कार पार्किंगच्या जागेवर दुचाकी पार्क झाल्याचं पाहून त्याचा पारा चढला.

विजय आणि रवींद्र यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी झाली. या वादाचं पर्यवसन झालं ते पवार यांची दुचाकी चिरडण्यात.

विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये इतर रहिवासीही दिसत आहेत. विजयला रोखण्याऐवजी या घटनेचं व्हिडिओ शूटिंग करण्यात त्यांनी धन्यता मानल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणात दोघांनीही पवई पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.