मुंबई: अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते. 


दोन्ही बाजूंनी सावध पवित्रा 


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेलांचे दोन अर्ज दाखल केलत.राजकीय शह काटशहानंतर ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.


मूळ शिवसेना ही आमच्या बाजूने असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. 


दरम्यान, अंधेरी निवडणूक कार्यालय बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. निवडणूक कार्यालयाच्या आजूबाजूचा 100 मीटर अंतरावर असलेला परिसर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून संपूर्ण परिसर सील केला आहे. 


अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे. 


दरम्यान, ठाकरे गटाच्या ऋुतुजा लटके यांच्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा आज प्रशासनाने स्वीकारला आहे. सुरुवातीली हा राजीनामा न स्वीकारण्याची भूमिका घेतलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर महापालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. आज ऋतुजा लटके यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 


दुसरीकडे मुरजी पटेल यांनी भाजपकडून आपला अर्ज दाखल केला आहे. गत निवडणुकीत शिवसेना- भाजप युती असल्याने ही जागा शिवसेनेच्या रमेश लटकेंना सोडण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. यावेळी अंधेरी पूर्वच्या या जागेवर शिंदे गटानेही दावा केला होता. त्यामुळे मुरजी पटेल कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याबद्दल उत्सुकता होती. शेवटी अंधेरी पूर्वची जागा ही भाजपला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीचाही मार्ग मोकळा झाला.