ANDHERI EAST BYPOLL 2022 : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची आणि चिन्हबदलानंतरची ही पहिलीच निवडणूक. मात्र, सेनेतल्या दोन्ही गटांसोबतच ही परिक्षा भाजपचीही असणार आहे...अनेकांना यात आपल्या क्षमता सिद्ध कराव्या लागतील...आगामी महापालिका निवडणूकीची आणि राजकिय डावपेचांची लिटमस टेस्ट अंधेरी पोटनिवडणूक होणार आहे. 


काही वर्षांपूर्वी बांद्रा पूर्व पोटनिवडणूकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मातोश्रीच्या अंगणातच सेना विरुद्ध राणे या पोटनिवडणूकीतल्या संघर्षाची पुन्हा आठवण करुन दिली जातेय. सध्या संघर्षाचं मैदान आहे अंधेरी आणि राणेंऐवजी सेनेसमोर आहे शिंदे आणि भाजपचं आव्हान.


पोटनिवडणूकीतली पहिली परिक्षा - शिंदे-भाजप सरकारचीच
सेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आणि त्यानंतरच्या सत्तांतरापाठोपाठ नव्या सरकारबद्दल जनमत नेमकं काय सांगतंय याची चाचणी या पोटनिवडणूकीत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वजण आपली ताकत पणाला लावणार आहेत. 


पोटनिवडणूकीतली दुसरी परिक्षा - खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची
या पोटनिवडणूकीकरता शिवसेना पक्षाचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मिळावं म्हणून शिंदेंनी जंग जंग पछाडलं..अखेर धनुष्यबाण गोठलं आणि शिंदेंच्या हाती ढाल तलवार आली...पण,सध्या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तलवार चालवायला संधी नाही त्यांना केवळ ढाल घेऊन भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं लागणार...ठाकरे गटाच्या उमेदवार रुजुता लटकेंना शिंदे गटात ओढण्याच्या प्रयत्नांची चर्चा असो किंवा रुजुता लटकेंविरोधात नुकतीच दाखल झालेली भ्रष्टाचाराची तक्रार असो यामागे शिंदे गटाचा हात होता अशी राजकिय वर्तृळात चर्चा आहे...त्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकण्यापेक्षाही ठाकरे गटाचा उमेदवार पडणं हे शिंदेंसाठी जास्त महत्वाचं आहे...


पोटनिवडणूकीतली तीसरी परिक्षा - उद्धध ठाकरेंची 
सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर वर्षा बंगला सोडतांना सहानुभूतीची मोठी लाट उद्धव ठाकरेंच्या बाजुनं होती...तशीच लाट या पोटनिवडणूकीतही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही...सेना फुटली तरी सेना संपु देणार नाही हा निर्धार जर उद्धव ठाकरेंना खरा करुन दाखवायचा असेल तर ही पोटनिवडणूक शिवसेना ठाकरे गटाकरता पक्षाचं भविष्य ठरवणारी असेल. 


पोटनिवडणूकीतली चौथी परिक्षा -  मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेलांची
मुंबई भाजपची जबाबदारी आता आशिष शेलारांकडे आहे..महापालिका निवडणूकीकरता भाजपचे मुंबईतील रणनितीकार म्हणूनही त्यांच्याच कडे पाहिलं जातंय...२०१७ मध्ये आशिष शेलारांच्याच रणनितीखाली भाजपनं मुंबईत मुसंडी मारली होती...मात्र, दरम्यानच्या काळातल्या राजकिय उलथापालथी आणि सध्याचं वातावरण पहाता आशिष शेलारांकरता अंधेरी पोटनिवडणूकीतला विजय भाजपकडे खेचून आणणं अनिवार्य ठरतंय...तर आणि तरच भाजपच्या आगामी महापालिका निवडणूकीच्या रणनितीची कमान आशिष शेलारांच्या हाती राहील...तसंच, भाजपची उमेदवार निवड सार्थ ठरवून राजकिय कारकिर्दीत नवं पान जोडण्याकरता मुरजी पटेलांनाही ही निवडणूक प्राणपणानं लढावी लागेल 


पोटनिवडणूकीतली पाचवी परिक्षा - अनिल परब आणि रुजुता लटकेंची
पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवण्याची संधी रुजुता लटकेंना मिळतेय खरी...पण केवळ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन चालणार नाही...तर संघर्ष करणा-या स्त्रीच्या भूमीकेतही त्यांना वावरावं लागेल. सोबतच, रुजुता लटकेंचा राजिनामा आणि उमेदवारीकरता महापालिका प्रशासनापासून कोर्टापर्यंत झगडणा-या अनिल परबांनाही आपल्या अचूक नियोजनाची चुणूक दाखवावी लागेल...शिवसेना ठाकरे गटाच्या संकटकाळात अनेकजण ठाकरेंची साथ सोडत असतांना जर हा विजय अनिल परबांनी ठाकरे गटाकरता खेचीन आणला तर आगामी काळात पुन्हा एकदा अनिल परब ठाकरेंचे संकटमोचक ठरतील.  अनेक अर्थांनी आणि अनेकांकरता अटीतटीची असणारी अंधेरी पोटनिवडणूक ही कुणाच्या गटाला आशेचा किरण दाखवतेय आणि कुणाला राजकिय अंधारात ढकलतेय हे काही दिवसातच कळेल.