Andheri By Poll Election: महाराष्ट्र विधानसभेच्या '166- अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजेपासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली . यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवरून सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला  निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत.


आज सकाळपासून या पोटनिवडणुकीचं मतदान संथ गतीनं होत असल्याचं पाहायला मिळालं. सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान झालं होतं तर दुपारी एक वाजेपर्यंत 16.89 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के मतदान झालं होतं. तर 5 वाजेपर्यंत 28.77 टक्केच मतदान झालं आहे. अजून काही मिनिटं आता मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. आज होणाऱ्या मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तरी देखील झालेलं मतदान पाहता लोकांनी सुट्टी एन्जॉय केल्याचंच दिसून येतंय.


अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. आता ऋतुजा लटके यांच्यासमोर सहा अन्य उमेदवारांचं आव्हान आहे.


या पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात 


१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)


अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 256 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिसांसह 1600 कर्मचारी आणि CRPF च्या 5 कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. आता 6 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. तसं तर भाजपच्या उमेदवाराच्या माघारीनंतर ऋतुजा लटके यांचा रस्ता सुकर झाला आहे मात्र अंतिम निकाल हाती येईस्तोवर सर्वांचं लक्ष अंधेरी पूर्वकडे असणार आहे.


हे देखील वाचा- Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्व मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान