मुंबई : राज्यभरात आज होळीचा सण साजरा केला जात आहे. सामन्यांपासून राजकारणी देखील ठिकठिकाणच्या होळीला हजेरी लावत या उत्सवात सहभाग नोंदवत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी होळीसाठी मुंबईतील प्रसिद्ध वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे वरळी हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. 


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अमित ठाकरे यांनी हजेरी लावल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी वरळीवर विशेष लक्ष दिल्याचं यातून स्पष्ट होत आहे. 


अमित ठाकरे यांनी मध्यरात्री 12 वाजता होळीसाठी वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि उत्साहाच्या वातावरणात कोळीवाड्यात होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कोळी बांधवांसह स्थानिकांनी गर्दी केली होती.


कोळीवाड्यात एक दिवस आधीच होळी दहन 
मुंबई आणि राज्यभरात आज होळी साजरी केली जाणार असली तरी मुंबईतल्या कोळीवाड्यात होळीच्या सणाला एक दिवस आधीच सुरुवात झाली आहे. कोळी बांधव परंपरा जपत हा सण साजरा करत असल्याचं पाहायला मिळालं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करतात आणि होळी दहन करुन गाण्यावर ठेका धरतात. 


मनसेचं वरळीवर विशेष लक्ष
लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तर वरळी हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. भाजपसह मनसेने वरळीवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यातच होळीचा सण असल्याने स्थानिकांशी संपर्क करण्याची आणि संवाद साधण्याची संधी कोणालाही सोडायची नाही. आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होळीसाठी लावलेली हजेरी, याकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे.