मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शाहांचा हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपच सरकार सत्तेत येणार आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा अमित शाहांनी केली.
अमित शाहांनी आपल्या भाषणात, "कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है" असं बोलत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील विधानसभा निवडणूकही भाजपसाठी कलम 370 चा मुद्दा महत्त्वाचा असेल, असं दिसून येत आहे. कारण नाशिकमधील सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कलम 370 चा मुद्दा लावून धरला होता. कलम 370 च्या मुद्द्यावरुन अमित शाहांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
तसेच पंडीत नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. तर काश्मीर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा असू शकतो मात्र काश्मीरआमच्यासाठी कधीच राजकीय मुद्दा नव्हता, असं अमित शाहांनी सांगितलं.
अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार : अमित शाह
- कुछ भी हो, कुछ भी न हो, जीत हमारी पक्की है : अमित शाह
- काश्मीरचा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता : अमित शाह
- आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं : अमित शाह
- काश्मीर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा असू शकतो, आमच्यासाठी नाही : अमित शाह
- 370 चा मुद्दा राजकीय असल्याचं राहुल गांधी म्हणतात, मात्र ते राजकारणात नवीन आहेत : अमित शाह
- कलम 370 मुळे काश्मीरात दहशतवाद वाढला : अमित शाह
- कलम 370 हटवल्याने काश्मिरींना न्याय मिळाला : अमित शाह
- पंडीत नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे : अमित शाह
- 370 रद्द केल्याने काश्मीरमध्ये रक्तपात होईल, काँग्रेसने म्हटलं होतं. कलम 370 हटवल्यापासून काश्मिरात एकही गोळी चालवावी लागली नाही किंवा एकही मृत्यू झालेला नाही : अमित शाह
- कलम 370 हटवायला शरद पवार यांचा विरोध आहे की पाठिंबा आहे ते त्यांनी स्पष्ट करावं : अमित शाह
- महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात 370 कलम हटवण्याचा मुद्दा घेऊन जावं : अमित शाह
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष निर्लज्जपणे 370 कलम हटवण्याला विरोध करत आहे : अमित शाह