मुंबई: शिवसेनेसोबतचा तणाव टोकाला गेला असताना, आज भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होणार आहे.


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गतच अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

स्पेशल रिपोर्ट : भाजपवर 'संपर्क फॉर समर्थन'ची वेळ का आली? 

भाजपच्या मित्रांमधला शिवसेना सर्वात मोठा पार्टनर आहे.  मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये विळ्या-भोपळ्याचं वैर काही लपून राहिलेलं नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपच्या कारभारावर वारंवार जहरी टीका करतात. मात्र तरीही हे दोन्ही पक्ष सत्तेत भागीदार आहेत.

पण पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही पक्षांतील तणाव वाढला.

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा होत असलेला पराभव आणि विरोधकांची एकी पाहता अमित शाह यांना दुरावलेले मित्र जोडण्यात यश येणार का? हे पाहावं लागेल.

‘सामना’तून टीकास्त्र

दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

देशात पेट्रोलचा भडका उडाला असून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत... आणि शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरु आहे.  पालघर पोटनिवडणुकीप्रमाणे साम, दाम, दंड, भेद वापरुन शेतकरी संप मोडून काढू असे प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत मोदी जगात आणि शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत, त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे.

तर आगामी 2019च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे.. यावर पुन्हा एकदा जोर देण्यात आला आहे.

2019 च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत, असंही सामनात म्हटलं आहे.

अमित शाह यांचा दौरा

12 वाजता - मुंबई विमानतळावर आगमन

12:30 वाजता - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना मातृशोक झाल्याने त्यांची आणि त्यांच्या परिवाराची वांद्रे येथे भेट.

1 वाजता -  रंगशारदा येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि संगठन मंत्री विजय पुराणिक यांच्याशी चर्चा

3:30 वाजता - अभिनेत्री माधुरी दीक्षित ह्यांची जुहू येथे त्यांच्या निवासस्थानी भेट

4:30 वाजता - भारतरत्न लता मंगेशकर ह्यांची पेडर रोड या निवास्थानी भेट

5:30 वाजता - उद्योगपती रतन टाटा ह्यांची कुलाबा येथे निवासस्थानी भेट

7:30 वाजता -  मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची भेट

9 वाजता - सह्याद्री गेस्ट हाऊस भाजप राज्य निवडणूक प्रचार समितीची लोकसभा निवडणुक तयारी आणि आढावा बैठक

10:30 वाजता - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि संगठण मंत्री विजय पुराणिक यांच्यासोबत चर्चा

संबंधित बातम्या 

अमित शाह 'मातोश्री'वर जाणार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार  

शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली : संजय राऊत