Amey Ghole on ED Raids in Mumbai : सकाळपासूनच ईडीनं मुंबईत छापेमारी सुरू केली आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी केली जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी (ED Raids) सुरू आहे. सूरज चव्हाणांच्या निवास्थानी आणि मालमत्तांवर ईडीकडून छापे टाकले जात आहेत. अशातच यावर काही दिवसांपूर्वीच नारज होऊन ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या अमेय घोले (Amey Ghole) यांनी खरमरीत ट्वीट केलं आहे. शिवसैनिकांच्या कामाची टक्केवारी खाणारा कारकून, असा उल्लेख करत अमेय घोले यांनी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


काय म्हणालेत अमेय घोले? (Amey Ghole)


आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यावरील ईडीच्या छापेमारीनंतर अमेय घोले यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "ज्या कारकुनाच्या घरी छापा पडला, त्याला बरोबर ठराविक बैठीकीन आधी, Acres Club चेंबूर येथे किती कंत्राटदार भेटायला येत होते आणि ह्याचे त्यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, ह्याची सुद्धा चौकशी व्हावी." तसेच, पुढे ट्वीटमध्ये अमेय घोलेंनी म्हटलं आहे की, "शिवसैनिकांना मिळालेल्या कामाची टक्केवारी खाणार्‍या ह्या कारकूनावर, जर शिवसेनेसाठी जीव झोकून देणारे निम्म्याहून अधिक विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक व शिवसैनिक नाराज आहेत, तर ह्यामागची कारणं ही तितकीच गंभीर असावीत."






शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा 


शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घरीही ईडीकडून छापेमारी सुरू आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्या हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे.


सूरज चव्हाण कोण? 


मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विविध निवडणुकांमागे ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात, असं मानलं जातं. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाताना सूरज चव्हाणांबाबत घोलेंकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त 


आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मुंबईतील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडताना अमेय घोलेंनी पक्ष श्रेष्ठींना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातही त्यांनी सूरज चव्हाण यांच्यावर थेट आरोप केले होते. अमेय घोलेंनी पत्रात म्हटलं होतं की, तुमच्यामुळे राजकारणात आलो. युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली. गेली 13 वर्ष अंत्यत प्रामाणिकपणे काम केले. वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करताना श्रद्धा जाधव आणि सूरज चव्हाण यांनी कामात वारंवार अडथळे आणले. त्यामुळे काम करताना खूप त्रास झाला. याबाबत तुम्हाला वेळोवेळी माहितीदेखील दिली. संघटनेतील मतभेद दूर व्हावे यासाठी मी खूप प्रयत्न केला. मात्र, यावर तोडगा काढण्यात आला नाही. जड अंत:करणानं युवासेना सोडत असून कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ED Raid in Mumbai : BMC कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापेमारी