मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चर्चेआधीच युतीमधील वादाला आणखी हवा मिळण्याची चिन्हं आहेत. कारण भाजपाध्यक्षांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर मुंबई महापालिकेने शुक्रवारीच हटवले.


अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाहांच्या स्वागताचे फलक लावले होते. परंतु शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिने हे पोस्टर उतरवले आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अमित शाह रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच मनपाने पोस्टर उतरवायला सुरुवात केली आहे.

शिवाय अमित शाह यांचे बरेच कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृहस मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे आहे. महापालिकेने नेमके याच परिसरातील फलक हटवल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतं.

दरम्यान, व्यापारी तसंच उद्योजकांच्या होर्डिंग्जवर प्रशासन कारवाई करत नाही. पण राजकीय पक्षांच्या पोस्टरवर मात्र कारवाई केली जाते. शिवसेनेच्या होर्डिंग्जवरही कारवाई होते. त्यामुळे याबद्दल आयुक्त किंवा संबंधित अधिकारी अधिक सांगू शकतील, असं सांगत शिवसेनेने चेंडू आयुक्तांच्या कोर्टात टाकला.

शाह-ठाकरे यांच्या भेटीआधीच महापालिकेने फलक हटवल्याने शिवसेना-भाजपातील कटुता आणखी वाढण्याची शक्यता आहे.