मुंबई : मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. कारण आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा वापर करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली आहे.


मनसेने काल अॅमेझॉनविरोधात खळ्ळखट्याक आंदोलन केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर अॅमेझॉन आता बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. अॅमेझॉनन काही वेळातच मराठी भाषेच्या पर्यायाबद्दल घोषणा करेल, असं ट्वीट मनसे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे.







Amazon vs MNS Case | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अखिल चित्रे काय म्हणाले?
मनसेने केलेल्या खळ्ळखट्याक आंदोलनानंतर अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे नेत्यांसोबत चर्चा केली. या विषयी अखिल चित्रे यांनी सांगितलं की, "आम्हीअॅप आणि वेबसाईटवर चूज युवर ओन लॅन्ग्वेज या पर्यायात लवकरच मराठी भाषा आणत आहोत. आम्ही क्षमस्व आहोत, असं अॅमेझॉनने म्हटलं आहे. ज्याप्रकारे अॅमेझॉनने मधल्या काळात मराठी द्वेष दाखवला होता, तेव्हाच मनसेने कार्यकर्त्यांनी त्यांना सह्याद्रीचं पाणी पाजणार असा इशारा दिला होता. त्याचप्रकारे काही महाराष्ट्रात काही ठिकाणी फटाके फुटले. त्यामुळे झोपलेलं अॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना, आमच्या सचिवांना, कामगार नेत्यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे अॅमेझॉनने राज ठाकरेंची माफी मागावी ही आमची पहिली अट होती. आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठीचा समावेश करत असल्याचं त्यांनी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर नमूद करावं. आम्हाला कागदी घोडे नाचवण्यात आणि पत्रव्यवहार करण्यात रस नाही. ते त्यांनी केलं आहे. सचिवांविरोधातील सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत."


मनसे-अॅमेझॉनमधील वाद
अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन 'नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन' असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अॅमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.