मुंबई : सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाई असताना आता त्यात टोल दरवाढीचा भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलच्या दरांमध्ये आता वाढ केली जाणार आहे. ही वाढ पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत असेल. तसेच मासिक पासच्या दरात देखील वाढ करण्यात येणार आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू होईल. एकीकडे लोकल बंद असताना, टोल दरवाढीमुळे मुंबईत ये-जा करणाऱ्य लाखो वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसणार आहे.


मुंबईत प्रवेश करण्यासाठी पाच मार्गांचा वापर करण्यात येतो. दहिसर, ऐरोली, वाशी, आनंद नगर (मुलुंड) आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग (मुलुंड) या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोल नाके आहेत. मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलाच्या उभारणीचा खर्च वसूल करण्यासाठी हे टोलनाके उभारण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या एमईपी कंपनीच्या करारानुसार 2002 ते 2027 अशा पंचवीस वर्षांसाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल वसूल करण्यात येणार आहे. तसेच दर तीन वर्षांनी या टोलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची तरतूद या करारात आहे. त्यामुळेच 2017 नंतर आता 2020 मध्ये टोल दर वाढ केली जात आहे.


एक ऑक्टोबरपासून या टोलचे नवीन दर लागू होतील. त्यानुसार कार, जीपसारख्या चारचाकी हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने, त्यांना 35 रुपयांच्या ऐवजी चाळीस रुपये टोल द्यावा लागेल. मिनी बससारख्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 55 रुपयांवरून 65 रुपये करण्यात आला आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे. केवळ एका टोलसाठी असलेला मासिक पास आता 1240 रुपये करण्यात आला असून पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये होणार आहे.


पाहा व्हिडीओ : मुंबईकरांना टोलवाढीचा झटका, 1 ऑक्टोबरपासून पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलदरात वाढ



मुंबईच्या याच टोल नाक्यावरून प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करतात. शिवसेनेने मागच्या निवडणुकीत या टोलपासून कायमची मुक्ती देऊ असे आश्वासन मुंबईकर आणि ठाणेकरांना केले होते. मात्र टोलमुक्ती शक्य नसल्याचे काही दिवसांपूर्वीच नगर विकास मंत्रालयाने स्पष्ट केले. या खात्याचा कारभार ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे भाजप आमदार संजय केळकर यांनी टोलमुक्तीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर ठाण्यात मनसेने काही दिवसांपूर्वीच एम एच झिरो फोर वाहनांना टोलमुक्ती द्यावी यासाठी आंदोलन केले होते. आता टोलमुक्ती तर दूरच पण टोल दरवाढ होणार असल्याने मनसेची प्रतिक्रियादेखील बघावी लागणार आहे. Covid-19 च्या काळात होणार असलेली ही टोल दरवाढ येत्या काही दिवसात मोठा राजकीय मुद्दा बनणार हे निश्चित. मात्र त्यातून सामान्यांना दिलासा मिळणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.


लोकल बंद असल्याने मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना रास्तेमार्गाने प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यात खड्डे आणि त्यामुले होणारे ट्राफिक रोजची डोकेदुखी असताना, टोलदर का वाढवले जात आहेत असा सवाल विचारण्यात येत आहे. तसेच दर वाढवले की रस्ते देखील खड्डेमुक्त होणार का? असाही सवाल सर्वसामान्य नागरिक विचारात आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलदरात वाढ