कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईत लोकलनं प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सीए मोहन भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून सध्या सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, याच कोरोनांमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, राज्यातील ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्या नागरिकांना महाराष्ट्रात येताना आरटीपीसीआर टेस्ट न करताच येण्याची परवानगी 15 जुलै रोजी राज्य सरकारने दिलेली आहे. त्यामुळे मुंबईतही ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लसीकरण झाल्याच्या 15 दिवसांनी कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करत विलेपार्ले येथील रहिवाशी आणि चार्टर्ड अकाऊंटट असलेल्या मोहन भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.