मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे भागातील वृक्षतोड बहुमताने मंजूर झाल्यानंतर त्या समितीमधील तज्ज्ञ सदस्यांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले होते. ते आरोप पूर्णतः निराधार असल्याचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. आरेतील वृक्षतोडीबाबत 29 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. 2 हजार 185 झाडे कापणे आणि 461 झाडांचे पुनर्लागवड करण्याचा प्रस्ताव होता. त्यावेळी तज्ज्ञ सदस्यांनीही मतदान केले होते. त्या अनुषंगाने या समितीतील तज्ज्ञ सदस्यांवर आरोप करण्यात आले होते. या आरोपांबद्दल डॉ. शशिरेखा सुरेश कुमार आणि डॉ. चंद्रकांत साळुंखे या तज्ज्ञ सदस्यांनी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांना 'ई-मेल' पाठवून खंत व्यक्त केली. "वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत दुर्दैवाने आम्हाला फारच वाईट अनुभव आला. काही समिती सदस्यांचे गैरवर्तन होते, तर काहींनी प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी पैसे घेतल्याचा जाहीर आरोप केला. आम्ही आमच्या व्यवसायात आदरणीय स्थानांवर आहोत. मात्र आरोपांमुळे कामाच्या ठिकाणी आमची प्रतिमा खराब झाली असून कौटुंबिक तणावही वाढला आहे," असे ई-मेल मध्ये म्हटले आहे. या अनुषंगाने तज्ज्ञ सदस्यांच्या 'ई-मेल'ला उत्तर देताना, प्रविणसिंह परदेशी यांनी म्हटले आहे की, "वृक्ष प्राधिकरण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणावर करण्यात आलेले आर्थिक देवघेवीचे आरोप पूर्णतः निराधार आहेत, असे स्पष्ट करतो."