मुंबई : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनीही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारणं बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे समोर आल्यानंतर स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
आरोग्यमंत्री काय म्हणाले?
"फक्त सरकारीच नव्हे, तर खासगी रुग्णालयांनीही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पुढील दोन दिवस स्वीकारल्या पाहिजेत. यासंदर्भात आरोग्यसेवा संचालक लवकरच परिपत्रक काढतील. केंद्रीय अर्थमंत्र्यांशीही यासंदर्भात चर्चा झाली आहे.", असे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी माहिती दिली.
...तर रुग्णालयांवर कारवाई!
जर कोणत्या रुग्णालयाने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारल्या नाहीत, तर संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिला. स्वत: दीपक सावंत यांनी मुंबईतील वांद्रेस्थित लीलावती रुग्णालयात यासंदर्भात जाऊन चौकशी केली. लीलावती रुग्णालयात 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारत असल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आले.
दिल्लीतील 'एम्स'कडून लोकांच्या सोईचा निर्णय
दिल्लीतल 'एम्स'ने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांसदर्भात जनसामान्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचे पाहून 9 आणि 10 नोव्हेंबरला 'एम्स'च्या 5 रुग्णालयांमध्ये 100 रुपयांहून कमी उपचार खर्च झाल्यास पैसे घेतले जाणार नाहीत. म्हणजेच 100 रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील. ओपीडीसाठी लागणारा 10 रुपयांचा खर्चही 10 नोव्हेंरला घेतला जाणार नाही.
आरोग्य सेवा संचालनालयाचा आदेश :