मुंबई : विविध चाचण्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या एसी लोकलची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना येत्या काळात सर्वच लोकल एसी मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 अंतर्गत मिळणाऱ्या सर्वच लोकल ऑटोमॅटिक डोअर सिस्टीमच्या आणि वातानुकूलित असणार आहेत.


मेट्रो प्रमाणे असणाऱ्या या गाड्यांची किंमत 80 ते 100 कोटी रुपये असेल. 2023 ते 2024 पर्यंत या गाड्या मुंबईकरांच्या सेवेत येतील, अशी माहिती आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली.

एमयूटीपी-3 प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या सर्व गाड्या मेट्रोच्या धर्तीवर वातानुकूलित असाव्यात, ही मागणी मान्य झाली आहे. या गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात सामील होण्यासाठी 2023-2024 पर्यंत वाट पाहावी लागेल, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलणं हा एक चांगला मार्ग आहे. त्यासाठी राईट्स या संस्थेतर्फे अहवाल तयार करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती आहे. सर्व कार्यालये एकाच वेळी सुरु झाल्याने गर्दी होते. मात्र त्यात बदल केल्यास गर्दी कमी करणं सोपं होऊ शकेल.

या बैठकीत इतर अनेक महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेले. यामध्ये बेलापूर-सीवूड्स-उरण मार्ग, एमयूटीपी-2 योजनेतंर्गत वांद्रे ते बोरीवली हा मार्ग 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं प्रभूंनी सांगितलं.