मुंबई : आपलं वेगळेपण दाखविण्या साठी चित्रपट अभिनेते नेहमीच धडपडत असतात. याचा प्रत्यय काल एका कार्यक्रमात आला. काल मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात आलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आपल्या उजव्या पायावरील टॅटू लोकांना दिसावा यासाठी त्याने पॅन्ट विचित्र पद्धतीने घातली होती.
काल संध्याकाळी वरळी इथं मुंबई पोलीस दलाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये वरळी सी फेस या परिसरात पेट्रोलिंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना सेगवे ही अत्याधुनिक कार्यप्रणालीची स्कूटर प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अक्षयकुमार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांच्या अगोदरच अक्षय कुमारने हजेरी लावली.
मात्र येताना त्याने परिधान केलेली पॅन्ट विचित्र पद्धतीने घातली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष अक्षयच्या पायांकडे गेलं. अक्षय कुमारच्या उजव्या पायावर एक टॅटू कोरण्यात आलेला आहे. हा टॅटू लोकांना दिसावा किंवा त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जावं यासाठी अक्षय कुमारने उजव्या पायामध्ये पॅन्ट फोल्ड करून गुडघ्याच्या वरपर्यंत घेतली होती. तर डाव्या पायात पूर्णपणे पॅन्ट व्यवस्थित ठेवली होती. या अशा अवस्थेमध्ये या सरकारी कार्यक्रमांमध्ये अक्षय वावरत होता. कार्यक्रमासाठी आलेल्या बहुतांश मुंबईकरांचं लक्ष अक्षयच्या पायांकडे गेलं. अक्षयच्या पॅन्टची चर्चा लोकांमध्ये रंगली. मुंबई पोलिसांच्या विशेषत: सरकारी कार्यक्रमांमध्ये कसं यावं या संदर्भातलं तारतम्य अक्षयला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली होती.
महाराष्ट्र पोलीस दलाचे खास अभिनंदन - गृहमंत्री अनिल देशमुख
कोविडच्या काळात नवीन वर्षानिमित्त होणारी गर्दी रोखण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर होती. एकीकडे सर्व नागरिक आपल्या कुटूंबासोबत नविन वर्ष साजरे करीत होते, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे डोळ्यात तेल घालून रस्त्यावर पहारा देत होते. यामुळेच नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही. महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. कोणताही सणवार असो महाराष्ट्र पोलिस नेहमीच सतर्क राहून जनतेला पारंपरिकरित्या ते साजरे करता यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. त्याचप्रमाणे नवीन वर्षसुध्दा नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबत साजरे करता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज होते. मग ते मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर असो वा शेवटच्या टोकाच्या गडचिरोली जिह्यातील पोलीस दल असो. एकूणच काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने बंदोबस्त केला. त्यामुळे नवीन वर्षास कोणतेही गालबोट लागले नाही. कोविड-19 च्या महामारीच्या काळात राज्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, आदि कर्मचाऱ्यांसमवेत पोलीस दलाने सुध्दा चांगल्याप्रकारे काम केलेले आहे आणि अजूनही कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहेत. कोरोनाचा प्रकोप रोखण्याकरिता शिस्तबध्दरित्या काम करण्याची मोठी जबाबदारी पोलीसांवर आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबत हेही काम त्यांना करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो आणि ते पुढेही करीत राहिल, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.