Dhananjay Munde Health Update : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना तातडीने रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेतेमंडळींनी धाव घेतली आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 


धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंची तब्येत स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं आहे. दुपारी त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करतील, त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. त्यांना भोवळ आली आहे. एमआरआय करण्याचं काम सुरू आहे. त्यांना कोणतंही पथ्य नाही, घाबरण्याचं कारण नाही असं ते म्हणाले. उद्या बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यांच्या विभागाचा कार्यक्रम आहे. आम्ही कार्यक्रम करतो असं त्यांना सांगितलं आहे, असं अजित पवार म्हणाले. 


धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. 


अजित पवार म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे इकडे येऊ नका, धनंजय मुंडे लवकर बरे व्हावे असं वाटतं असेल तर तिथूनचं शुभेच्छा द्या. आम्ही इथं लक्ष ठेऊन आहोत, असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. मी डॉक्टरांना सांगितलंय की तुमचं समाधान होईपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करु नका, असंही ते म्हणाले. 


मुंडे यांची प्रकृती स्थिर - आरोग्यमंत्री 


मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.






दरम्यान सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -