Ajit Pawar on Nawab Malik: महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच मुंबईत विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. या बैठकींमध्ये संभाव्य आघाड्या आणि उमेदवारांविषयी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन्ही आघाड्या मनपा निवडणुकीत एकसंध राहणार का? अशीही चर्चा आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र आली असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदांमुळे चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडेच 

भाजपच्या कडाडून विरोधाला न जुमानता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई मनपाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याच खांद्यावर कायम ठेवली आहे. भाजप आणि शिवसेनेचा विरोध सुरु असतानाच त्यांनी जबाबदारी कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी एका समवन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री अदिती तटकरे, मुंबईचे दोन कार्याध्यक्ष, आमदार सना मलिक यांची एकत्रित समिती स्थापन होण्याची शक्यता आहे. अदिती तटकरे मुंबईच्या संपर्कमंत्री असून महायुतीत चर्चेसाठी त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही

दरम्यान, नवाब मलिक यांना विरोध करत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले होते की, “जर नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. त्यांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत.” भाजपने स्पष्ट केले आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील गटाशी ते मुंबईत आघाडी करणार नाहीत. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कारवायांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाचा आरोप आहे. त्यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, आणि ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण म्हणाले, “प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबईतील भाजप नेत्यांनी महायुतीतील एकतेला धक्का लागू न देणे महत्त्वाचे आहे.” दुसरीकडे, मुंबईत राष्ट्रवादीसाठी नवाब मलिक महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईत पक्षाची संघटनात्मक ताकद कमी असली तरी, नवाब मलिक यांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेमुळे मुस्लिम आणि दलित मतदारांवर प्रभाव आहे. दरम्यान, राज्यस्तर आघाड्यांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यातील 29 शहरी भागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील, पण मुंबईत राष्ट्रवादीबाबत निर्णय वेगळा असू शकतो.”

इतर महत्वाच्या बातम्या