मुंबई: एअर इंडियाच्या बंगळुरु-मुंबई विमानात एक अनोखा सोहळा पार पडला. तो म्हणजे एका एअरहोस्टेसच्या निरोप समारंभाचा. यात अनोखं आणि विशेष हे होतं की ज्या एअरहोस्टेसचा काल शेवटचा दिवस होता त्यांची मुलगीच या विमानाची को-पायलट होती.


पूजा चिंचणकर असं निवृत्त झालेल्या एअरहोस्टेसचं नाव आहे, त्यांनी 38 वर्षे एअर इंडियात नोकरी केली. पूजा यांची कन्या अश्रिता ही एअरबस ए 319 या विमानाची को-पायलट होती.

पूजा चिंचणकर यांची काल एअरहोस्टेस म्हणून ही शेवटची फ्लाईट होती.  त्यामुळे या माय-लेकींचा आणि चिंचणकर कुटुंबियांचे  खास क्षण फ्लाईटमधील स्टाफनं कॅमेऱ्यात कैद केले आणि ते ट्विटरवर शेअर केलेत.

कॅप्टन परेश नेरुरकर यांनी विमानातील प्रवाशांना एक सूचना देण्यासाठी लक्ष वेधलं. त्यावेळी प्रवशांना विमानाला विलंब किंवा हवामानाबाबत सूचना असल्याचं वाटलं. पण कॅप्टन नेरुरकर यांनी वेगळीच सूचना दिली.

ते म्हणाले, “हे विमान धावपट्टीवर उतरताच फ्लाईट अटेंडंट पूजा चिंचणकर 38 वर्षाच्या सेवेतून निवृत्त होतील. महत्त्वाचं आणि योगायोग म्हणजे कॉकपिटमध्ये जी को पायलट आहे, ती त्यांचीच मुलगी अश्रिता आहे”.

कॅप्टन नेरुरकर यांच्या या सूचनेनंतर विमानात एकच उत्साहाचं वातावरण झालं. सर्वांनी पूजा चिंचणकर यांना शुभेच्छा दिल्या.

58 वर्षीय पूजा चिंचणकर यांनी 38 वर्ष सेवा बजावली. विमान धावपट्टीवर उतरताच, प्रवशांनी एअरहोस्टेर पूजा चिंचणकर आणि को पायलट अश्रिता यांचं स्वागत केलं.

यावेळी पूजा चिंचणकर यांनी काही आठवणी जागवल्या. त्या म्हणाल्या, “मी 1980 मध्ये इंडियन एअरलाईन्समध्ये रुजू झाले, तेव्हा केवळ दोनच महिला पायलट होत्या. त्यामध्ये भारताच्या पहिल्या महिला कमांडर कॅप्टन सौदामिनी देशमुख यांचाही समावेश होता.

काही वर्षांनी मला जेव्हा मुलगी झाली, तेव्हा मी ठरवलं होतं, माझ्याही लेकीला पायलट बनवायचं. कालांतराने अश्रिता मोठी होत गेली, तशी ती माझा युनिफॉर्म, माझे सहकारी, माझी नोकरी वगैरे पाहात ती मोठी झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्रिता 2006 मध्ये वैमानिक प्रशिक्षणासाठी कॅनडाला गेली. त्यावेळी इंडिगो, किंगफिशर, एअर डेक्कन, स्पाईस जेट आणि गो एअर या विमान कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात पायलट्सची गरज होती.

2008 मध्ये अश्रिता प्रशिक्षण पूर्ण करुन, व्यावसायिक पायलट परवाना घेऊन परतली, तेव्हा मात्र भारतात मंदीची लाट होती, त्यामुळे तिला नोकरीसाठी झगडावं लागलं. अश्रिताचे प्रयत्न सुरुच होते, अखेर 2016 मध्ये अश्रिताला त्याच एअर इंडियात नोकरी मिळाली, ज्या विमानात मी एअर होस्टेस होते”.

अश्रिता को पायलट

2006 ते 2018 पर्यंत माय-लेकींनी अनेकवेळा एकत्र प्रवास केला. आई खूपच प्रोफेशनल होती. पायलट, को पायलटला काय हवं-नको ते नेमकं ओळखत असे.  ती कॉकपिटमध्ये येऊन मला आवश्यक वेळी चहा-कॉफी विचारायला येत असे. ती माझ्याशी कॅप्टन म्हणूनच वागत असे. आईचा तो आवाज मी मिस करेन, असं अश्रिताने सांगितलं.

आईची इच्छा

पूजा चिंचणकर यांनी निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान प्रवासात मुलगी अश्रिता को पायलट असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. कंपनीने ते मान्य केलं. त्यांनी एअर इंडियाचं AI 603 हे मुंबई-बंगळुरु आणि AI 604 बंगळुरु-मुंबई या  विमानाने शेवटचा एकत्र प्रवास केला.