कल्याण : तब्बल अडीच तासानंतर मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गाची वाहतूक सुरळीत होण्याची चिन्ह दिसत आहे. कारण, टिटवाळा स्टेशनजवळ रेलरोको करणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी रुळावरुन बाजूला केलं आहे. यानंतर पहिली गाडी मुंबईच्या दिशेने रवानाही झाली.


प्रवाशांच्या रेलरोकोमुळे मागच्या अडीच तासांपासून कल्याण-कसारा वाहतूक बंद होती.खडवली स्टेशनजवळ मंगळवारी रात्री पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे सकाळी अनेक लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच 5.55 मिनिटांची टिटवाळा लोकल थांबवून दोन एक्स्प्रेस गाड्यांना मार्ग देण्यात आला.

त्यामुळे संतप्त प्रवांशानी टिटवाळ्याजवळ रेलरोको केला आहे. परिणामी कल्याणहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या आणि कसाऱ्याहून कल्याणकडे येणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. तसंच अनेक एक्स्प्रेस ट्रेन्सही रखडल्या आहेत.

अखेर रेल्वे प्रशासनाने अडीच तासांनंतर आंदोलक प्रवाशांना रुळावरुन हटवलं. त्यानंतर गोरखपूर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना केली. तसंच प्रवाशांना एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

रखडलेल्या एक्स्प्रेस गाडा

साकेत एक्स्प्रेस
भुसावळ एक्सप्रेस
गीतांजली एक्स्प्रेस
तपोवन एक्स्प्रेस
वाराणसी एक्स्प्रेस
एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस