मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून बेस्ट कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांश राव यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी अडचणीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांची यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली. मध्यरात्रीपासून संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे, बेस्ट कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पगार वेळेवर होतील असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर शशांक राव यांनी संप मागे घेण्याची तयारी दाखवली. मात्र, बेस्टचा कारभार असाच सुरू राहिला तर एक दिवस बेस्ट बंद पडेल अशी भीती देखील उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. संप मागे घेतल्यानंतर बेस्टचे कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असून सेवा पूर्वपदावर येत आहे.
‘तुमची जबाबदारी आम्ही घेतो’, उद्धव ठाकरेंचं बेस्ट कर्मचाऱ्यांना आश्वासन
‘नाईलाजामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावर जावं लागलं. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराची आम्हाला चिंता आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशीही चर्चाही झाली आहे. बेस्टचे पगार वेळत होतील याची शाश्वती आम्ही देतो. पण बेस्टचा कारभार असाच सुरु राहिला तर एक दिवस बेस्ट नक्कीच बंद पडेल त्यामुळे त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांच सहभाग गरजेचा आहे. संप मागे घ्या, तुमची जबाबदारी आम्ही घेतो.’ असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.
उद्धव ठाकरेंनी जबाबदारी घेतली तर काळजीचं कारण नाही : शशांक राव, बेस्ट कामगार कृती समिती अध्यक्ष
‘जर उद्धव ठाकरेंनी जबाबदारी घेतली तर कामगारांनी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही संप मागे घेतो. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला आहे की, 10 तारखेला पगार होणार. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत अध्यादेश काढणार. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये यासंबंधीचं सुधारित विधेयक आणलं जाईल.’ अशी माहिती यावेळी शशांक राव यांनी दिली.
‘मातोश्री’वरील बैठकीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2017 05:30 PM (IST)
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून बेस्ट कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांश राव यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -