निरंजन डावखरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मात्र यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते.
त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली.
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.
नरेंद्र पाटील यांची विधानपरिषदेतील मुदत जुलै 2018 मध्ये संपत आहे.
नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया
"गेल्या काही दिवसात माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या मागण्या आणि मराठा मोर्चाच्या मागण्या पूर्ण होत असतील, तर आपण भाजपाचा विचार करु शकतो" अशी प्रतिक्रिया आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
कोण आहेत नरेंद्र पाटील?
माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचीत
नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.
नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आमदार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या संपर्कात आहेत.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादीला धक्का, निरंजन डावखरे भाजपत!