मुंबई : मुंबईवरील 26/11 चा हल्ला देशातील नागरिक कधीही विसरणार नाहीत. त्यानंतर पाकिस्तानने पुलवामा येथे भारतीय जवानांवर मोठा हल्ला केला होता. मात्र 26/11 हल्ल्यानंतर जे घडलं ते पुलवामा हल्ल्यानंतर घडलं नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानामध्ये घुसून हल्ल्याला चोख उत्तर दिलं. मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी तयार होतं, असं माजी एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंग धनोआ यांनी सांगितलं. धनोआ मुंबईतील व्हीजेटीआय कॉलेजमधील एका कार्यक्रमात बोलत होते.


भारताने बालाकोटमध्ये योग्य रणनिती आखून हल्ला केला होता. अशाप्रकारचा हल्ला पाकिस्तानवर आपण आधी सुद्धा करु शकलो असतो. मुंबईत 26/11 चा हल्ला झाला त्यावेळी हवाई दल पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार होतं. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दलाने पूर्ण तयारी केली होती. हवाई दलाची लढाऊ विमाने एअरस्ट्राईकसाठी तयारही होती, अशी माहिती धनोआ यांनी दिली. मात्र असे हल्ले करण्यास लष्कर तयार असलं तरी राजकीय निर्णय खुप महत्वाचे असतात. बालकोटमध्ये योग्यवेळी निर्णय घेतला गेला त्यामुळे असा पराक्रम घडला. बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला कळालं, भारत जशास तसं उत्तर देऊ शकतो, असं धनोआ यांनी सांगितलं.


भारतीय हवाई दलाबद्दल माहिती देताना रणनीती, सद्यस्थितीबद्दल भाष्य करुन टेक्नॉलॉजी हवाई दलात किती महत्वाची आहे, याची माहिती त्यांनी दिली. येत्या वर्षात म्हणजे मे 2020 पासून हवाई दलाच्या ताफ्यात येणाऱ्या लढाऊ विमान राफेल आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल असणार आहे, असं धनोआ यांनी सांगितलं. लष्करात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला खुप महत्व आहे. त्यासाठी इंजिनीअरिंगचं योगदान मोठं आहे, असं धनोआ यांनी सांगितलं.


राफेल लढाऊ विमान 2020 पर्यंत भारतीय हवाई दलात सामिल होईल. तर सर्व राफेल विमान 2022 पर्यंत भारताला मिळतील. मिग 27 टेक्निकल आयुष्य संपलं आहे. त्यामुळे आज कारगिलमध्ये हिरो राहिलेलं हे लढाऊ विमान शेवटचं उड्डाण घेतं आहे. देशात नवीन प्रयोग करणाऱ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.