मुंबई : ज्येष्ठ संगीतकार, गीतकार, कवी यशवंत देव यांची चिता थंड होत नाही तोच त्यांच्या मृत्युच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे घर घर रिकामं प्रयत्न सुरू झाला आहे. यशवंत देव राहत होते ते शिवाजी पार्क येथील त्यांचे घर रिकामे करण्याची नोटीस घरमालकाने दिली आहे. यशवंत देव यांच्या अस्थी बांधलेल्या घराच्या दरवाजाजवळच ही नोटीस चिकटवण्यात आल्याने घरमालकाच्या या असंवेदनशिलतेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
शिवाजी पार्क येथील ‘वंदन’ इमारतीमध्ये यशवंत देव राहत होते. ती इमारत चौधरी कुटुंबियांच्या मालकीची आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून देव यांचे या घरात वास्तव्य होते. या घरात अनेक अजरामर भावगीतांचा जन्म झाला, ती सूरबद्ध आणि संगीतबद्ध झाली. ते घर ताब्यात घेण्यासाठी घरमालक उतावीळ झाले आहेत.
पागडी पद्धतीने देव यांच्या पत्नीने लग्नापूर्वी ते घर घेतले होते. लग्नानंतर देव आणि त्यांच्या पत्नी तिथे राहत होत्या. देव यांचे पुतणे ज्ञानेश आणि त्यांचे कुटुंबीय यांचेही त्या घरामध्ये वास्तव्य आहे. तरीही त्यांना काहीही कल्पना न देता घरमालक दिलीप चौधरी आणि ओजस चौधरी यांनी घर खाली करण्याची सक्ती केली आहे, अशी माहिती यशवंत देवांचे पुतणे ज्ञानेश देव यांनी दिली आहे.
संगीतकार, गायक, कवी अशी ओळख
30 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. यशवंत देव यांची मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत गीतकार-संगीतकार म्हणून ओळख राहिली. वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा त्यांनी पुढे कायम चालविला. जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळे यशवंत देव संगीताकडे वळले. सुरुवातीच्या काळात लग्नानंतर यशवंत देव यांनी रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत त्यांनी ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर 1951 मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले.
यशवंत देव यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली आहेत. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतिच्या फुला..’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘येशिल येशिल येशिल राणी’, अशा अनेक संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना सुरेल मराठी गीतांची अनुभूती यशवंत देव यांनी दिली. लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, आशा भोसले, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली. तसेच, ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची त्यांची गाणी विलक्षण गाजली.
मृत्युच्या दुसऱ्याच दिवशी यशवंत देवांचे घर रिकामं करण्याची नोटीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2018 12:04 PM (IST)
यशवंत देव राहत होते ते शिवाजी पार्क येथील त्यांचे घर रिकामे करण्याची नोटीस घरमालकाने दिली आहे. यशवंत देव यांच्या अस्थी बांधलेल्या घराच्या दरवाजाजवळच ही नोटीस चिकटवण्यात आल्याने घरमालकाच्या या असंवेदनशिलतेबद्दल संताप व्यक्त होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -