मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट संपामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाचा सामना करत आहेत. मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मराठी कामगार सेना आणि इतर ओला-उबर चालक संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक-मालक संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. ओला-उबरचं किमान भाडे 100 ते 150 रुपये करावं. प्रति किलोमीटरला 18 ते 23 रुपये दर करण्यात यावे. कंपनीने नवीन वाहने घेणे बंद करुन सुरु असलेल्या वाहनांना समान काम द्यावे. या मागण्यांसाठी ओला, उबरनं गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये 12 दिवसांचा संप पुकारला होता.
या संपानंतर अॅप बेस्ड टॅक्सी कंपन्यां फक्त 1 ते 3 रुपये इन्सेटिव्ह देत आहेत. आता कंपन्यांनी मालकांचे आयडी बंद करुन त्याऐवजी लीजवरील गाड्यांना भाडे देणे सुरु केले आहे. यामुळे व्यवस्थापनाविरुद्ध चालक-मालकांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसण्याचे ठरवले आहे. याआधीच्या संपावेळी मुख्यमंत्र्यांनी संपकरी चालक-मालक यांना आश्वासन दिलं होते. आता त्या आश्वासनाप्रमाणे तोडगा काढावा, अशी मागणी संघटनांची आहे