मुंबई : मेट्रो, रेल्वे आणि बेस्ट यांची सांगड घालून एकाच पासवर मुंबईत कुठेही फिरता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मेट्रो, रेल्वे आणि बेस्ट यांना एकच पास ही प्रणाली यशस्वी झाली तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच 500 इलेक्ट्रिक बस देखील मुंबईकरांसाठी आणण्याचा विचार सुरु असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.


केवळ 20 रुपयांमध्ये संपूर्ण मुंबईत कुठेही फिरण्याची सुविधा बेस्टकडून दिली जाणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. बेस्टकडे जास्तीतजास्त प्रवासी आकर्षित होतील आणि त्यांना चांगली सुविधा देण्याचे प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.


बेस्ट संदर्भात आज महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. गेल्या वर्षभर बेस्ट संदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होती, ती आज पूर्ण झाली आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आज महापालिका आणि बेस्टने प्रवास भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टचे अभिनंदन करण्यासाठी मी या परिसरात आलो असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.





मुंबईत बेस्ट बसेसच्या संख्येत वाढ करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. बेस्ट बसेसची संख्या तीन हजारांहून सहा हजारांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने एसी बसचा अधिक समावेश असावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच 500 इलेक्ट्रिक बस देखील मुंबईच्या रस्त्यांवर धावतील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी 'बेस्ट' उपक्रमाने नव्या भाडेदराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे बेस्ट बसचं किमान भाडं आठ रुपयावरुन पाच रुपये केलं आहे. पाच किमी अंतरासाठी मुंबईकरांना पाच रुपये भाडं द्यावं लागणार आहे. बेस्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत नव्या तिकीट दराला मंजुरी देण्यात आली.