मुंबई: मुंबई विद्यापीठानं आता निकालाची नवी डेडलाईन दिली आहे. याआधी 31 जुलै ही निकालासाठीची डेडलाईन होती. मात्र, आता 5 ऑगस्ट ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या या कारभारावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.


आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ‘31 जुलै ही डेडलाईन संपली तरी सर्व निकाल अजूनही लागलेले नाही. त्यामुळे हा कुलगुरुंचा अपमान आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु आहे.’ अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

'असा भोंगळ कारभार याआधी कोणीही पाहिला नव्हता. हा लाजिरवाणा कारभार आहे. इतके दिवस झाले तरी निकाल का लागू शकले नाहीत?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


'या संपूर्ण गोंधळाला जबाबदार कोण?, मार्कशीट कधी मिळणार, टेंडर कुणाला आणि कसं दिलं? त्यात घोटाळा आहे का?' असे प्रश्न उपस्थित करुन आदित्य ठाकरेंनी याप्रकरणात काही घोटाळा झाला आहे का? अशी शंकाही उपस्थित केली आहे.

अजूनही 324 परीक्षांचे निकालांची प्रतीक्षा

31 जुलैची डेडलाईन संपण्याआधी मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखेतील 153 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर अजूनही इतर शाखेतील 324 परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत असून 90 टक्के मूल्यांकन झाल्याची माहिती आहे.

मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालांमध्ये कलाशाखेचे 78, तंत्रज्ञान विभागाचे 48, विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे 10, वाणिज्य शाखेचे 7, असे एकुण 153 निकाल जाहीर करण्यात आले आहेत. वाणिज्य व विधी शाखेचे निकाल वगळता बहुतांश शाखेतील 90 ते 98 टक्के मुल्यांकन झाल्याचं विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उर्वरित 55 निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतल्याने मुंबई विद्यापीठाने मुल्यांकनाच्या कामासाठी नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर विद्यापीठांची मदत घेतल्याचंही विद्यापीठाने स्पष्ट केलं. एकूण 17 लाख 36 हजार 145 उत्तरपत्रिकांपैकी 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झालं आहे, तर 3 लाख 25 हजार 305 उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन लवकरच विद्यापीठातर्फे केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द

मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता

मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी