मुंबई : 'एक दुजे के लिए', या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती अनिल विरवानी यांच्याविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रीसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टने त्यांच्यावर 49 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा आरोप केला आहे.
रती अग्निहोत्री आणि अनिल विरवानी यांच्यावर मीटरमध्ये छेडछाड करुन 48.96 लाख रुपयांची वीज चोरल्याचा आरोप आहे.
वरळीतील स्टर्लिंग सी-फेस अपार्टमेन्टमध्ये रती अग्निहोत्री यांचं वास्तव्य आहे. 4 एप्रिल 2013 पासून याच घरातील मीटरमध्ये छेडछाड करुन 1 लाख 77 हजार 647 युनिटचं वीजेचं 48.96 लाखाचं बील अग्निहोत्री यांनी भरलं नाही, असं बेस्टच्या इंजिनिअरच्या लक्षात आलं.
इंजिनिअर तक्रारीनंतर रती अग्निहोत्री आणि अनिल विरवानी यांच्याविरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं बेस्टतर्फे सांगण्यात आलं आहे.