मुंबई : सरकारविरोधात बोलल्याने ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण रोखण्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एनजीएमएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. घडलेल्या प्रकाराबद्दल अमोल पालेकरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अमोल पालेकर नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल पालेकर यांनी भाषणात म्हटलं की, आर्ट गॅलरीने कसं आपलं स्वातंत्र्य गमावलं आहे. त्यावेळी अमोल पालेकरांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये एक 'सल्लागार समिती' होती, स्थानिक कलाकार ज्याचं प्रतिनिधित्व करायचे. यावर बोलताना पालेकर म्हणाले की, आता ती समिती थेट केंद्रीय संस्कृती मंत्रालयातून नियंत्रित केली जाते.
अमोल पालेकरांनी ज्यावेळी सरकारच्या निर्णयांवर बोलण्यास सुरुवात केली, त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या समन्वयकांनी त्यांना वारंवार थांबवण्याचा प्रयत्न केला आणि कार्यक्रमासंबंधी बोलण्यास सांगितलं. अखेर अमोल पालेकरांनी थेट त्यांना विचारणा केली की, मी भाषण मधेच संपवावं, असं तुम्हाला वाटतं का? त्यावेळी समन्वयकांनी प्रभाकर बर्वे यांच्याविषयी बोलावं आणि भाषण लवकर संपवावं असं सांगितलं.
त्यानंतर मात्र अमोल पालेकरांनी नाराजी व्यक्त करत माझं भाषण राखू कसे शकता? अशी विचारणा करत भाषण मधेच थांबवलं आणि खाली बसले.
व्हिडीओ