पालघर : राज्यामध्ये काल (28 मार्च) रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू झालेले आहेत. दरम्यान, बोईसर आलेवाडी नांदगाव जवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी छापा टाकून 47 जणांवर कारवाई केल्याचे समोर आले आहे.
पालघर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत तालुक्यात सुमारे 500 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. होळी सणाच्या निमित्ताने शहरी भागातून अनेक एक नागरिक आपल्या मूळ गावी परतले असून आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्रिय राहणार आहे.
पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध
पालघर जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिलपासून सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. 15 एप्रिलपर्यंत पुर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घेऊन कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
राज्यात कोरोनाचा उद्रेक!
राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.