ठाणे : अॅसिड कंटेनर उलटल्यामुळे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी घोडबंदर रोडवर अॅसिड वाहतूक करणारा ट्रक उलटून अॅसिड रस्त्यावर पसरलं.


ट्रकमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही ड्रम्स होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या गायमुख भागात भरधाव जाताना ट्रक उलटला आणि रस्त्यावर अॅसिड सांडलं. त्यानंतर रस्त्यातून अॅसिडच्या वाफा दिसू लागल्या.

या अपघातात कंटेनरचा चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळाच्या परिसरातील शाळा ताबडतोब सोडून देण्यात आल्या आणि ऑक्ट्रॉय नाकाही तातडीने बंद करण्यात आला. विद्यार्थी आणि ऑक्ट्रॉय नाका कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. दरम्यान याच भागात आणखी एक अॅसिड कंटेनर उलटल्याची माहिती आहे. मात्र त्या कंटेनरच्या ड्रायव्हर-क्लीनरने घटनास्थळावरुन पोबारा केला.