मुंबई : मुंबईत रोजच कुठे ना कुठे सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतात. यामुळे पोलीस सुद्धा हैराण झाले असताना, दहिसर पोलिसांनी 12 वर्षांपासून हा गुन्हा करणाऱ्या सोनसाखळी चोराला अटक केली आहे. साजिद अब्दुल अजीज शेख (वय 37 वर्षे) या आरोपीचे नाव असून त्याला या चोरीमध्ये मदत करणारी त्याची पत्नी, मेहुणी आणि मित्राला सुद्धा अटक करण्यात यश आलं आहे. त्यांना मकोका कायद्याअंतर्गत अटक केली आहे.


या आरोपींनी आतापर्यंत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार या ठिकाणी सुद्धा सोनसाखळी चोरीच्या एकूण 108 गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. दहिसरचे पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपीचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला आहेत. तर आरोपी वांद्र्याच्या रिक्लेमेशनच्या झोपडपट्टीत राहतो. आरोपी साजिद हा बजाज पल्सर 220 ने या चोरलेल्या दुचाकीचा वापर चोरीसाठी करत होता. ही दुचारी त्याने कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीबी नगर परिसरातून चोरली होती.



साजिद 2008 पासून चेन स्नॅचिंग करत आहे. त्याला ठाणे पोलिसांनी अटक करुन तुरुंगातही टाकलं होतं. पण जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने चोरी करणं सुरुच ठेवलं. उत्तर मुंबईत तो अधिक सक्रिय झाला. दहिसर पोलिसांनी मालवणी येथून 34 वर्षीय आतिफ मोबिल अन्सारीला मालवणी येथून सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अटक करण्यात यश मिळवलं.



चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साजिदची पत्नी समीम आणि मेहुणे आरिफ यांना 86 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली. 22 ऑगस्ट रोजी पोलिसांनी साजिदला पकडण्यात यश मिळवलं. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याने तर बाहेर आला. परंतु शंभरहून अधिक प्रकरणांमुळे पुन्हा साजिदला मकोकाअंतर्गत अटक करण्यात आली. त्यावरुन मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद दहिसर सध्या पोलिस कोठडीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली आहे.