पालघर : पालघरमध्ये माजी आमदार विवेक पंडित आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरींमधला वाद चांगलाच टोकाला पोहोचला आहे. श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप निधी चौधरींनी केला आहे.


पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांसदर्भात श्रमजीवी संघटनेनं 24 एप्रिल रोजी मोर्चा काढला होता. विवेक पंडित यांनी या मोर्चाचं नेतत्वं केलं. यावेळी जिल्ह्यातील बालकांना सकस आणि दर्जेदार आहार मिळावा. तसेच आंगणवाडी सेविकेंचं मानधन लवकरात लवकर मिळावं, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना धक्काबुक्की करत, त्यांच्याशी गैरवर्तन केलं. या घटनेची गंभीर दखल घेऊन 26 एप्रिल रोजी पोलिसांनी माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

यानंतर चौधरी यांनी आपली व्यथा ट्वीटरच्या माध्यमातून मांडली. चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, पुराणकाळातील सीता आणि द्रौपदीचा संदर्भ दिला आहे.




यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार विवेक पंडित म्हणाले की, ''चौधरी यांची गाडी अडवून त्या गाडीतून उतरल्यानंतर शांतपणे आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या. त्यांच्याशी कसलीही गैरवर्तणूक झाली नाही. सोशल मीडियात त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओचा या घटनेशी काहीएक संबंध नाही आहे. शिवाय घटना घडून गेल्यानंतर 24 तासांनी आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.''

दरम्यान, पंडित यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना अटक झाली असून, त्या सर्वांनी जामीन घेण्यास नकार दिला आहे.  त्यामुळे त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची रवानगी ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.