मुंबई : सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी आज (सोमवार) मुंबईत राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. छगन भुजबळ यांच्यावरची कारवाई आकसापोटी केली जात आहे, असा दावा भुजबळ समर्थकांनी केला. येत्या मार्च महिन्यात मुंबईत भुजबळ समर्थक मेळावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज भुजबळांचे समर्थक राज ठाकरे यांची भेट घेतली.

त्यामुळे आता याप्रकरणी राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा हायकोर्टाचं दार ठोठावलं आहे. पीएमएलए कोर्टानं फेटाळलेल्या जामिनाला भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलं. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आपण निर्दोष असल्याचा पुनरुच्चार करत सर्वोच्च न्यायालयानं मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम 45(1) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.