मुंबई : क्वॉरंटाईन सेंटरमध्ये तरुणीशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. मालाड येथील जनकल्याण नगरमधील न्यू भूमी पार्कच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये 21 वर्षीय तरुणीशी छेडछाड करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 354 अंतर्गत गुन्हा करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे.


सदर घटना 15 जून रोजी घडली आहे. पीडित तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तिला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये बोलावण्यात आलं होतं. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये गेल्यानंतर तरुणीला सांगण्यात आलं की तुझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आहे आणि तिला तुला उद्या घरी सोडण्यात येईल. मात्र त्यादिवशी क्वॉरंटाईन सेंटरमधील रुममध्ये ही तरुणी एकटी असताना तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपी तिथून पळाले.


दुसऱ्या दिवशी तरुणीचे कुटुंब तिला घरी घेऊन गेले. तरुणीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर 20 जूनला पीडित तरुणीने आणि तिच्या आईने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अमित तटकरे याला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमित तटकरे हा महानगरपालिकेचा कर्मचारी नसून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करत होता. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस अजून करत आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये त्याचा किती सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.


पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी करून पोलीस तपास करत आहेत. सोबतच या घटनेमध्ये फरार असलेला दुसऱ्या आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर क्वॉरंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून असे प्रकार पुन्हा घडू नये याची देखील आता दक्षता घेतली जात आहे.


Rural News |  माझं गाव माझा जिल्हा, ग्रामीण भागातील बातम्यांचा आढावा