मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची दिवसाची सुरुवात खोळंब्याने झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एका वाळूच्या डंपरने गेटला धडक दिल्याने अपघात झाला. बिघाड दुरुस्त झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला असला तरी, वाहतूक मात्र अद्याप उशिराने सुरु आहे. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे.


आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. खडीने भरलेला एक डंपर आंबिवली पूर्वेहून पश्चिमेकडे जात होता. यावेळी आंबिवली फाटकात डंपरचालकाला वळण नीट घेता आलं नाही आणि डंपर थेट रेल्वे गेट तोडून रुळांवर घुसला. यामुळे ओव्हरहेड वायरही तुटल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी लोकल आणि प्रामुख्याने पहाटे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठा फटका बसला. मात्र मध्य रेल्वेने युद्धपातळीवर ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण करत आधी रेल्वेसेवा सुरु केली.


ज्या डंपरने हा अपघात झाला, तो डंपर रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे.


लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका
आंबिवली रेल्वे खोळंब्याचा फटका लोकल वाहतुकीप्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे. राज्यातील नंदीग्राम, देवगिरी, विदर्भ आणि नागपूर दुरांतो या गाड्यांना याचा फटका बसला आहे. तसंच उत्तरेकडून मुंबईत येणाऱ्या यूपी मेल आणि गोरखपूर एक्स्प्रेसवरीह याचा परिणाम झाला आहे.


वाहतूक सुरु, मध्य रेल्वेचा दावा
दरम्यान मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरु झाली असून बिघाड दुरुस्त झाल्यावर सकाळी 6.10 मिनिटांनी ट्रेन रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "आंबीवली लेवल क्राॅसिंग गेट क्र. ४८ ला रस्त्यावरील एका वाहनाने धडक दिल्यामुळे लेवल क्रॉसिंग बूम खराब झाले आणि ओव्हर हेड वायरला टच केले होते. यामुळे ईशान्य मार्गावरील कसारा-कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती. बूम पुन:प्रस्थापित होऊन ट्रेन ६.१० वाजता रवाना झालेली आहे."