मुंबई : विद्यापीठ कायद्यात बदल केल्याचा आरोप करत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातून विधान भवनाकडे हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांचे अधिकार कमी करण्यात आले असून, उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांना प्र-कुलगुरुपद देण्यात येणार असल्यानं हे आंदोलन करण्यात आले होते. जर विद्यापीठ कायद्यात बदल केला तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला आहे.


राज्य मंत्रीमडळाच्या १५ डिसेंबरला झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रस्तावीत असून हिवाळी अधिवेशनात याचे कायद्यात रुपांत होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या धोरणामुळे सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल हे थेट कुलगुरूंची नियुक्ती करु शकणार नाहीत. यापुढे कुलगुरूंची निवड ही राज्य शासनाने सुचवलेल्या नावांमधूनच राज्यपालांना करावी लागणार आहे .त्यामुळे राज्य शासन हे कुलगुरुंच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कुलपतीपदावर प्र-कुलगुरुपद देण्यात येणार  असून, त्या पदावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे एबीव्हीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल हे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालणारे आहेत. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढणार असल्याचे एबीव्हीपीने म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शिक्षणाचे राजकीयकरण सुरू असल्याचा आरोपही एबीव्हीपीने केला आहे. मात्र, याविरोधात एबीव्हीपी आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. 


महत्त्वाच्या बातम्या: