मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून सध्या ते घरीच राहून आराम करत आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे माझा कट्ट्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यादरम्यान त्यांनी कार्यक्रमातील कोविडशी लढा देत असताना आलेले आपले अनुभव सांगितले आहेत.


कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'मला माझ्या या प्रवासातलं काहीच आठवत नाही. 19 एप्रिलपर्यंत मला सगळं आठवत आहे. पण त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. कदाचित मी भाग्यवान आहे. म्हणूनच मला काही आठवत नाही. 10 तारखेला मला डॉक्टरांनी सांगितलं की, माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतरही लोकांमध्ये जाण्याची सवय मला मोडता आली नाही आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागले. कोरोना झाला असताना सर्वांनी काळजी घेणं गरेजचं आहे, जी मी घेतली नाही. लोकांमध्ये जाऊन 80 हजार पाकिटं वाटणं, माझ्या मतदार संघात कोणीही उपाशी झोपता कामा नये, अशी मानसिकता घेऊन लढाई लढायची. पण त्यामध्ये आपल्या प्रकृतीचं काय होतंय आणि त्यामुळे आपल्या घरच्यांचं काय होईल, याबाबत कधी विचारच केला नाही. आजार झाल्यानंतर हे सर्व विचार जेव्हा मनात येतात, त्यावेळी एक मनात भीती तयार होते की, आपण काय करून बसलो आहोत.'


जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाने घालून दिलेले नियम मोडल्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली असं सांगितंलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'मला शुगरचा त्रास आहे, पण ब्लड प्रेशरचा त्रास मात्र नाही. त्यामुळे हे सर्व मला लागू होत नाही. मला लागू होतो तो माझाच निष्काळजीपणा. एक अद्दल घडवण्यासाठी माझ्यासोबत हे घडलं असं माझं मत आहे.' ते म्हणाले की, 'आपण उगाच डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरबाबत बोलतोय, हा आजार कोणालाही होतो. रोगप्रतिकार शक्ती विक झाली की, हा आजार अटॅक करतो, असं माझं मत आहे. माझ्या ओव्हर एक्सरशनमुळे माझी इम्युनिटी विक झाली होती. थकवा तोपर्यंत या आजाराच्या लक्षणांमध्ये कुठेच नव्हता.'



पाहा व्हिडीओ : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर कशी केली मात? | माझा कट्टा



मला कोविड झालाय हे मला माहितचं नव्हतं : जितेंद्र आव्हाड


गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की, 'मला कोविड झालाय हे मला माहितीच नव्हतं. कारण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मी बेशुद्ध अवस्थेत होतो. त्यानंतर काय झालं, कोणत्या टेस्ट केल्या, याबाबतही मला काहीच माहित नाही. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, त्यावेळी तिथे मला जेवणाचं ताट यायचं. त्यावर इन्टेन्सिव्ह केअर युनिट कोविड आणि माझं नाव असायचं. त्यावरुन मला समजलं की, मला कोविड झालाय. पण तोपर्यंत मी सगळ्या प्रकरणातून सावरलो होतो.


माझ्या मुलीचं ऐकलं असतं तर मला एवढं भोगावं लागलं नसतं : जितेंद्र आव्हाड


हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मला कोणताच त्रास होत नव्हता. मला फक्त थकवा आला होता. माझी मुलगी सांगत होती की, यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. पण मी म्हटलं फक्त थकवाच तर आला आहे. कशाला जायचं हॉस्पिटलमध्ये? मी जर त्यावेळी तिचं ऐकलं असतं, जसं आज ऐकतोय. तर कदाचित तीन दिवस अॅडमिट होऊन मी घरी आलो असतो. एवढं भोगावं लागलं नसतं. पण थकवा हे कोरोनाचं लक्षण आहे, हे त्यावेळी आयसीएमआर किंवा डब्ल्यूएचओनेही जाहीर केलं नव्हतं. आता 4 ते 5 तारखेला त्यांनी जाहीर केलं की, तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही लगेच रुग्णालयात दाखल व्हा.


मी अॅडमीट झाल्यानंतरचे तीन दिवस फार कठिण : जितेंद्र आव्हाड


मला थकवा जाणवू लागल्यानंतर मी हॉस्टिटलमध्ये दाखल झालो. त्यानंतर 23 ला अॅडमिट झाल्यापासून 26 तारखेपर्यंतेचे तीन दिवस फार कठिण होते. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या मुलीला बोलावून सांगितलं होतं की, 70 टक्के केस आपल्या हातातून गेलेली आहे. 30 टक्के केस आपल्या हातात आहे. आता तुम्ही देवाची प्रार्थना करा, अर्थात ची भाषा असते की, प्रेयर्स विल हेल्प. पण तेव्हा कठिण होतं सगळं, असं आव्हाड बोलताना म्हणाले.


जेवणाच्या ताटावरून मला कोविड झाल्याचं कळलं तेव्हा एक चिठ्ठी लिहली : जितेंद्र आव्हाड


मला जेव्हा जेवणाच्या ताटावरून कळलं की, मला कोविड झाला आहे. त्यावेळी मी आयसीयूमध्ये दाखल होतो. मी एक चिठ्ठी लिहीली होती की, माझी जेवढी संपत्ती आहे तेवढी माझ्या मुलीच्या नावावर करावी. अभद्र विचार येतच होते. कारण आयसीयूमध्ये एकटा होतो, बाहेर कोरोनाचं थैमान होतं. माझ्याकडे बाहेरची परिस्थीत पाहण्यासाठी साधन नव्हतं पण तरिही मी अनुभवलं होतं. त्यामुळे मी चिठ्ठी लिहून ठेवली, असं आव्हाड यांनी बोलताना सांगितलं.