मुंबई : मुंबईला पुढील तीन ते चार महिन्यात एक सी बॅण्ड आणि चार एक्स बॅण्डचे रडार मिळणार आहे. अरबी समुद्रात वाढत्या चक्रीवादळाचे धोके लक्षात घेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. रडारमुळे पावसाची तीव्रता आणि ढगांमध्ये पाणी आहे की बाष्प याची माहिती मिळत असते.


ऐन तोक्ते चक्रीवादळाच्या तोंडावर मुंबईच्या रडारमध्ये बिघाड झाल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती. त्यानंतर आता मुंबईला नवीन रडार मिळणार आहे. एबीपी माझाला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालय अरबी समुद्राच्या किनारपट्टीसाठी दक्षिणेत मंगलोरमध्ये एक स्वतंत्र रडार तर अहमदाबादमध्ये देखील नवीन रडार उभारणार आहे. गुरुग्राममध्ये एक मोठे रडार इन्स्टॉल करण्यात आले आहे. ते देखील टेस्टिंगनंतर सुरु करण्यात येणा आहे. त्यामुळे उत्तर भारताला देखील पावसाचा अचूक अंदाज मिळणार आहे.  


एकीकडे तोक्ते चक्रीवादळाने मुंबईला तडाखा दिला असतानात, मुंबई हवामान विभागाचा (ड्यूप्लर वेदर रडार) अद्यापही नादुरुस्तच आहे. अभियंत्यांकडून दुरुस्तीचं काम अजूनही सुरु असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिली आहे.


तोक्ते चक्रीवादळाला काल (17 मे) तीन हायरिझोल्युशन सॅटेलाईट ट्रॅक करत होते. मात्र अशात देखील वादळाची तीव्रता अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. याचा अंदाज न आल्याने मुंबईसह इतर किनारपट्ट्यांवर मोठं नुकसान झालं आहे.