मुंबई : गेल्या आठवड्यात गोरेगांवच्या आरे कॉलनीतील डोंगराला आग लागली नसून लावण्यात आल्याचा अंदाज आहे. आगीचा अग्निशमन दलाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती आहे. आरेच्या जंगलात अनधिकृतरित्या काही लोकांची ये-जा झाली असल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.


अहवालातील नोंदींनुसार, गैरपद्धतीनं येथील प्रतिबंधित क्षेत्रात काही माणसांचा वावर झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. आग विझल्यानंतर केलेल्या तपासकामादरम्यान आग लागलेल्या ठिकाणी अर्धवट जळालेले टायर्स, बाटल्या, प्लास्टिक आढळून आलं आहे.


तसेच, डोंगराला लागलेल्या मोठ्या आगीनंतरही तेथील काही भागावर आगीचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. हे संशय निर्माण करणारे असल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. याबाबत, पोलिसांनी अधिक तपासणी करावी असंही सुचवण्यात आलं आहे.


मात्र, अग्निशमन दलाच्या या अहवालानंतर आरेतील आग लागली की लावली गेली हा संशय आणखी गडद झाला आहे.


3 डिसेंबरला गोरेगावातील आरेच्या डोंगराला आग लागली होती. आगीमुळे जवळपास 3-4 किमी पट्ट्यातील झाले जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, जवळपास 6 तासांनी ही आग विझवली. मात्र जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे.


संबंधित बातम्या


आरे कॉलनीतील आगीची सीआयडी चौकशीची शिवसेनेची मागणी


आग लागली की लावली? वनखात्याने तात्काळ चौकशी करावी : कदम


आरे कॉलनीच्या जंगलातील आगीवर सहा तासांनी नियंत्रण


आरे आगीमागे बिल्डर, भूमाफियांचे लागेबांधे : रामदास कदम