मुंबई: युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलं.

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. यामध्ये नव्या नेत्यांची नावं जाहीर करण्यात आली.

या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे एकूण १३ नेते असतील

  • मनोहर जोशी

  • सुधीर जोशी

  • लीलाधर ढाके

  • दिवाकर रावते

  • संजय राऊत

  • रामदास कदम

  • गजानन कीर्तीकर

  • सुभाष देसाई


नविन नियुक्ती

  • आदित्य ठाकरे

  • एकनाथ शिंदे

  • चंद्रकांत खैरे

  • आनंदराव अडसूळ

  • अनंत गीते


शिवसेना सचिव- मिलींद नार्वेकर, सूरज चव्हाण.

प्रवक्ते- अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

सत्यजीत तांबे यांच्याकडून अभिनंदन

दरम्यान, आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्याचं कळताच, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

"सतत नवीन काहीतरी करण्याची धडपड करणाऱ्या आदित्य ठाकरेंना माझ्या शुभेच्छा! आपण सर्व मिळून सर्वसामान्य युवकाचा आवाज होऊ", असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.


आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या ‘राष्ट्रीय’ अधिवेशनात आदित्य ठाकरेंना बढती देऊन त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढवणार असल्याचे कळते. सतत नविन काहीतरी करण्याची धडपड करणारे आदित्यंना माझ्या शुभेच्छा! आपण सर्व मिळून सर्वसामान्य युवकाचा आवाज होऊ

वाघाची अंगठी

शिवसेनेची यापुढे वज्र नाही तर व्याघ्रमूठ पाहायला मिळणार आहे. शिवबंधनानंतर शिवसैनिकांसाठी वाघाची अंगठी तयार करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं ८८ शिवसैनिकांना या अंगठीचं वाटप करण्यात आलं.

शिवसेनेचा वाघ हा शिवसेनेचे स्फूर्तीचिन्हच आहे. ते स्फूर्तीचिन्ह प्रत्येक शिवसैनिकांच्या मुठीत बळ देणारे ठरत आलं आहे. हेच डोळ्यासमोर ठेऊन कृष्णा पवळे या शिवसैनिकाने पुढाकार घेऊन आपल्या वाघाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ही अनोखी व्याघ्र अंगठी तयार केली आहे.