Aaditya Thackeray Shiv Sena Nishtha Yatra : युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे सध्या निष्ठा यात्रा करत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं की, फुटीर गटातही दोन गट आहेत. एक गट असा आहे ज्यांना जबरदस्तीनं पळवून नेलं आहे, त्यांना परत यायचंय आणि दुसरा असा की ज्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या, असा हल्ला आदित्य ठाकरेंनी केला आहे. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत.  जे पळून गेलेत  त्यांच्यातही दोन गट आहेत ते लवकरच समोर येतील.  काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत मात्र काहींना जबरदस्ती नेलंय.  थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, असं ठाकरे म्हणाले.  


आदित्य ठाकरे म्हणाले की, पोटदुखी हीच की ठाकरे परिवारातलं कुणीतरी विधीमंडळात आलं. आतापर्यंत आपण बाहेर जे करतोय ते आधी मातोश्रीवर कळत नव्हतं, आता कळतंय.


त्यांनी म्हटलं की, दिवसभर क्लेषदायक चित्र बघून घरी आलो तेव्हा मला आपले काही शिवसैनिक भेटले. तेव्हा लक्षात आलं की आपल्याबद्दल अजूनही आपल्याबद्दल प्रेम आहे. जे फुटीर आहेत त्यांच्या भावना खऱ्या नाहीत.  जे पळून गेले ते गेले, पण सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान 2-3 तगडे शिवसैनिक असे आहेत जे निवडून येतील, असंही ते म्हणाले.


मुंबई विद्यापिठ वसतीगृह नामकरणावर बोलताना ते म्हणाले की, मुंबई विद्यापिठातील वसतीगृहांना नावे देण्याबाबत वाद राजकारण होऊ नये. विद्यापीठाच्या बाहेर राजकारण ठेवावं. सावरकर आणि छत्रपती शाहू दोन्ही नावं फार थोर आहेत. एकत्र बसून तोडगा काढावा, असं ते म्हणाले. 


प्रकल्पावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्ही सुरु केलेल्या प्रकल्पांना जर कोणी स्थगिती देऊ पहात असेल तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ. .आम्ही ते प्रकल्प लोकांसाठी , मुंबईच्या भल्यासाठी सुरु केले. आमच्य़ावरचा द्वेष मुंबईवर नको, असं ते म्हणाले.