दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय?
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 08:55 AM (IST)
केंद्र सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचं सोनं खरेदी करायचं असल्यास, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सादर करणं बंधनकारक असेल.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्या सोनं खरेदी करण्याचा तुमचा बेत असेल, तर खरेदीला जाताना ओळखपत्र न्यायला विसरु नका. कारण आता 50 हजार रुपयांवरील सोनं खरेदीसाठी तुम्हाला ओळखपत्र बाळगणं अनिवार्य आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचं सोनं खरेदी करायचं असल्यास, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सादर करणं बंधनकारक असेल. काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशने 23 ऑगस्टपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र गेल्या महिन्याभरातला दसरा हा मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी होणारा पहिलाच मुहूर्त आहे. लग्नसराईचा मौसम सुरु होत असल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची जास्त उलाढाल होते. त्यामुळे सोनं खरेदीला जाताना सर्व ग्राहकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. एक तोळं सोन्याची किंमत साधारण 29 हजार 600 रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे दोन तोळ्यांच्या आसपास सोनं खरेदी करायचं असल्यास तुम्हाला वैध ओळखपत्र सोबत ठेवावं लागेल. नोटाबंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी अनेकांनी सोनं खरेदी केल्याचं उघड झालं होतं. त्यामुळेच सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.