ठाणे : कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक लुटण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. लुटारूंनी ट्रकसह सुमारे पाच लाख किमतींची 1 लाख 41 हजार अंड्यांसह 10 लाख 3 हजारांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर घडली होती.

या प्रकरणी अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने या गुन्ह्यात चार आणखी आरोपी असल्याचे सांगितले आहे. या टोळीने लुटलेल्या अंड्यांसह ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 14 लाख 12 हजार 766 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

हैद्राबाद येथून अंबरनाथ येथे अंडीने भरलेला ट्रक येत असतांना 18 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर काही अज्ञात चोरट्यांनी ट्रकसमोर कार आडवी करून ट्रकचालक महंमद नबी शेख व त्यांच्या 17 वर्षीय मुलाला मारहाण करीत दोघांचेही कारमधून अपहरण केले होते. तसेच दोघांनाही मारहाण करून निर्जनस्थळी सोडून दिले होते. त्यानंतर चोरट्यांनी अंडी भरलेला ट्रक पळवून नेला होता.

याप्रकरणी ट्रकचालक शेख यांच्या फिर्यादिवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सदर गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटकडे सोपवला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेताच तीन वेगवेगळी पथके तयार करून कसून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान भिवंडी येथील शहादात अन्सारी नामक इसम या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पथकास मिळाली.

त्यानुसार पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने ट्रक लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला ट्रक, त्यातील 1 लाख 16 हजार अंडी आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 14 लाख 12 हजार 766 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली. या घटनेतील मुख्य आरोपी शहादात व त्याचे साथीदार कर्जबाजारी झाले होते, या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सदर ट्रक लुटला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.