Maharashtra Politics Uday Samant:  राज्यातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांच्या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात मागील तीन महिन्यांपासून नकारात्मक वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करताना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात मागील तीन वर्षात उद्योग कोणामुळे बाहेर गेले याची चौकशी एका निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. राज्यातील उद्योग प्रकल्पांबाबत श्वेत पत्रिका काढण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. सामंजस्य करार झाला म्हणजे उद्योग राज्यात आला असा त्याचा अर्थ होत नाही, असेही त्यांनी म्हटले.


मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला. सामंत यांनी म्हटले की, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात प्रकल्प येत नाहीत असे वातावरण निर्माण केले जात आहे. सिनार्मस संदर्भात झालेला करार हा डावोसला झाला होता. मात्र करार झाला म्हणजे उद्योग आला असे होत नाही. काल, मंगळवारी, जमीन वाटप देकार पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे सामंत यांनी म्हटले. 


वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. वेदांतासंदर्भात 24 मे 2022 रोजी बैठक झाली होती. जूनमध्ये दिल्लीत बैठक झाली, पण त्याचे इतिवृत्त नसल्याचेही सामंत यांनी म्हटले. वेदांत फॉक्सकॉन संदर्भात करार झाला नव्हता. सिनार्मसचा जाणारा प्रकल्प थांबला असल्याचे सामंत यांनी म्हटले. राज्यात अडीच वर्षे पोषक वातावरण नव्हते यावर पत्रकार परिषद घेऊन बोलावे असे आव्हानही सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. येत्या काळात राज्यात 50 हजार कोटींचे प्रकल्प येणार असून 30 हजार कोटींचे करार झाले आहेत. त्यातील 10 हजार कोटींचा हाप्रकल्प हा आम्ही घेऊन आलो असल्याचे सामंत यांनी म्हटले.


माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती 


माजी न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. या समितीत दोन निवृत्त सनदी अधिकारीही असतील. ही समिती श्वेता पत्रिका काढणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. येत्या 60 दिवसात ही समिती चौकशी करणार असून येत्या काही दिवसांत श्वेत पत्रिका निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले.