मुंबई : सध्या राज्यभरात कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे 94व्या साहित्य संमेलनासमोर अडचण निर्माण झाली आहे. संमेलन रेटायचं म्हणून ठरलेल्या तारखेला घ्यायचं असा हट्ट आम्ही करणार नाही. पुढील 3 दिवसांत संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ संमेलनाबाबत साहित्य परिषद, स्थानिक जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्यासोबत बोलतील आणि त्यानुसार आम्हाला सूचना येतील. मला अपेक्षा आहे यादिवशी संमेलन होणार की पुढे जाणार याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती 94व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आज 'एबीपी माझा'ला दिली.


संमेलनाबाबत बोलताना हेमंत टकले म्हणाले की, नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावर सहस्त्र समस्या उभ्या आहेत. स्वतः स्वागताध्यक्ष पॉझिटिव्ह आहेत. फेब्रुवारी महिन्यात राज्यात अचानक रुग्ण संख्येत वाढ झाली. ही नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतं आहे. एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे 26, 27 आणि 28 मार्चला संमेलन होणार आहे. यासाठी आमची जय्यत तयारी सुरू आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्वतः अध्यक्ष जयंत नारळीकर आणि त्यांची पत्नी यांना पुण्यात जाऊन निमंत्रण दिलं आहे. आणि त्यांनी यायला मान्यता देखील दिली आहे.


साहित्य मंडळाकडून साहित्यिक आणि परिसंवादासाठी पाहुण्यांना निमंत्रण देखील लवकरच जातील. हे सर्व सुरू असताना नियोजित तारखेला काय परिस्थिती असेल हे आज सांगता येणार नाही. संमेलन त्या दिवशी घेतलं तर त्यादिवशी उपस्थितांची संख्या मर्यादित असेल. याबाबत ज्या सूचना प्रशासन देईल त्यानुसार आम्ही तयारी करू. आम्ही त्याठिकाणी सॅनिटायझिंग करण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक दोन तासांनंतर सॅनिटायझिंग केलं जाईल. तसेच सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात येतील. याची देखील व्यवस्था केली आहे. पुढील दोन दिवसांत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून आम्हांला पुढील सूचना देतील. अपेक्षा आहे पुढील 3 दिवसांत योग्य तो निर्णय होईल.


स्वागताध्यक्ष असो की अध्यक्ष हे ज्येष्ठ नागरिक आहेत, याठिकाणी मोठी गर्दी होईल कोरोना आणखी वाढू शकेल त्यामुळे संमेलन घेणं योग्य वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना हेमंत टकले म्हणाले की, यामध्ये सुधारणा होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. परंतु, सुधारणा दृष्टीपथात नाहीत. लोकांच्या आरोग्याशी तडजोड करून आम्हाला कोणतीही बाब करायची नाही. हट्टाने संमेलन पुढे रेटणार नाही. पुढील 3 दिवसांत संमेलनाबाबत योग्य तो निर्णय होईल. सध्या आम्हाला स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आठवडाभर थांबण्याचे आदेश दिले होते. लवकरच त्यांच्याकडून बैठकीबाबतचे आदेश येतील आणि त्यानंतर साहित्य मंडळासोबत आमची बैठक होऊन योग्य निर्णय होईल. आम्ही आयोजक आहोत. सर्व निर्णय साहित्यपरिषदेचे आहेत. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत. जर संमेलन 31 मार्चपूर्वी नाही झालं तर निधीची समस्या निर्माण होऊ शकते.


शासनाने या आर्थिक वर्षातील 50 लाख रुपये निधी आम्हाला दिलेला आहे. परंतु, संमेलन पुढं गेल्यानंतर एक विशेष बाब म्हणून काही करता येईल का याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काही मार्ग काढता येऊ शकेल का याचा प्रयत्न करू. नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये दिले आहेत. त्यांची देखील परवानगी घ्यावी लागेल. जर संमेलन ठरलेल्या तारखेला होणार असेल तर कोरोना प्रसार होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. समजा 5 हजार नागरिक येणार असतील तर आम्ही 10 हजार लोकांची व्यवस्था करू जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळणं असेल किंवा प्रत्येकाची टेस्ट करणं असेल याची व्यवस्था करता येईल मला. सध्या अनेक ग्रंथ विक्रेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. त्यांच्यासाठी देखील आम्ही योग्य ती व्यवस्था केली आहे. एकंदरीत आमची तयारी पूर्ण झाली असली तरी आता प्रत्येक्षात काय होतंय याची आम्ही देखील वाट पाहत आहोत.