मुंबई : अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते आज विधानसभेत म्हणाले की, आता मला वाटते की भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.
ठाकरे म्हणाले की, "वीर सावरकरांवर भाजप खूप प्रेम दाखवत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला दोन वेळा पत्र पाठविण्यात आले होते. तरीही सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावं.
ते पुढे म्हणाले की, भाजप सर्व महापुरुषांना आपले म्हणत आहे. सरदार वल्लभभाई पटेल असो वा सावरकर. उद्धव ठाकरे म्हणाले, "आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी करण्यात आले आहे. आम्ही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ठेवले आहे आणि त्यांनी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलले आहे. ते पुढे म्हणाले, की "आम्हाला तुमच्याकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणारचं, अशी आम्ही आपल्याला खात्री देतो."
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती मागणी
1988 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांनी रॅलीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली होती. तेव्हापासून शिवसेना नाव बदलण्याविषयी बोलत आहे. आता शिवसेना सत्तेत असून नावात बदल करण्याचा विचार करत आहे. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, फक्त भारत माता की जय बोलण्याने देशप्रेम सिद्ध होत नाही. संघमुक्त भारत करण्याबद्दल बोलणारे नितीशकुमार तुम्हाला डोक्यावर बसायला लागतात, हे तुमचं हिंदुत्व आहे. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की माझ्या महाराष्ट्रातील जनतेने डोळ्यांतील पाणी पुसावे आणि खोटं बोलणाऱ्यांना संपवून टाकावं.
शेतकरी आंदोलन
उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले, संत नामदेव हे महाराष्ट्राचे महान संत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये मोठं काम केले आहे. तेथील शेतकर्यांसाठीही काम केलं आहे, पण आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आला आहे, यावरदेखील विचार केला पाहिजे. देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांना येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या मार्गांवर खिळे ठोकले जात आहेत. शेतकर्यांसाठी इतकी तयारी केली पण चीनकडे बघून पळ काढला.