मुंबई : डोंबिवलीत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या उपस्थिती हा उद्घाटन सोहळा पार पडला.


उद्घाटनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन केलं. संमेलनाआधी कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मानपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या कार्यकर्त्यांना अटक केली.

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत बेळगाव कारवारमधून आलेल्या साहित्यिकांनी आंदोलन केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात पानसरे, दाभोलकरांच्या हत्या होतात, हे योग्य नाही. मलाही धमक्या आल्या. माझी बायकोही भीती व्यक्त करते. पण साहित्यिकाला पोलिसांच्या बंदुकीचे संरक्षण मिळावे हे योग्य नाही. या दहशतीचा मी निषेध करतो, अशा शब्दांत मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आपला निषेध व्यक्त केला.