मुंबई : महिलांना धाडसी होण्यासाठी बळ देईल, अशी एक घटना दादरमध्ये घडली आहे. दादरच्या 81 वर्षांच्या वृद्ध महिलेने एका चोराचा सामना करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

 

पुष्पाबेन भुल्ला असं या धाडसी वृद्धेचं नाव आहे. मुंबई पोलिसांनीही या वृद्ध महिलेच्या धाडसाला दाद दिली.

 

अशी घडली घटना!

दादरला राहणाऱ्या पुष्पाबेन बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या घराजवळील हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या. इतक्यात एक डमी पोलिस त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदतीच्या बहाण्याने जवळ आला.

 

'मी पोलिस असून पेट्रोलिंग करत आहे', असे चोराने पुष्पाबेन यांना सांगितले. पुष्पाबेन यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पाहून चोराने त्यांना बांगड्या बॅगमध्ये काढून ठेवायला सांगितल्या. इतक्यात बाजूलाच उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये पुष्पाबेन यांची नजर गेली. ज्यामध्ये या तोतया पोलिसांचे साथीदार बसलेले होते. त्यामुळे हा तोतया पोलिस असल्याचे पुष्पाबेन यांच्या लक्षात आलं.

 

हिंमतीने चोराचा सामना

पुष्पाबेन यांनी बांगड्या काढून बॅगमध्ये ठेवण्यास नकार दिल्यानंतर चोराने जबरदस्ती केली, पण त्याचा पुष्पाबेन यांनी मोठ्या हिंमतीने प्रतिकार केला. आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना जमवलं आणि चोराला चोप दिला, असं पुष्पाबेन यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं, असंही पुष्पाबेन यांनी सांगितलं.

 

आरोपीचं नाव अली रजा अजीज जाफरी असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

दरम्यान या घटनेमुळे पुष्पाबेन यांच्या घरातील सदस्यही आश्चर्यचकित आहेत. पुष्पाबेन यांनी घरच्या मुलांवर कधीही हात नाही उचलला, पण आज चोराचा सामना करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया पुष्पाबेन यांचा मुलगा हरेंद्र भल्ला यांनी दिली.