मुंबई : ‘बेस्ट’च्या ताफ्यात 75 नव्या बस दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व बसमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी आठ ठिकाणी जोडणी, हे विशेष आकर्षण ठरणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा बस डेपोमध्ये या नव्या बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या या नवीन बस उद्यापासूनच (25 एप्रिल) मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यामुळे उद्यापासून मुंबईतील रस्त्यांवर बेस्टच्या नव्या बस दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी गेल्या वर्षी टाटा कंपनीच्या नवीन 303 बस नव्याने घेण्याचा निर्णय घेतला. या सर्व बस नवीन वर्षात सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र, वेगवेगळ्या अडचणींमुळे या साऱ्याचं वेळापत्रक विस्कटलं. आता त्यातील 75 बस सेवेत आणल्या जात आहेत. "लवकरच इलेक्ट्रॉनिक्स बस सेवा मुंबईकरांसाठी सुरु करण्याचा विचार करत आहोत. जेणेकरून मुंबईच्या प्रदूषणाला आळा बसेल.", असं आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिलं. मेट्रो, लोकल, बेस्ट बस यांसाठी एकाच पासची सुविधा लवकरात लवकर करावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पाठवलं असल्याचं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमावेळी खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्टचे अध्यक्ष अनिल कोळील उपस्थित होते. नव्या बसचे फीचर्स :
  • प्रवासात मोबाइल चार्जिंगसाठी आठ ठिकाणी जोडणी
  • आधुनिक युरो-4 इंजिन
  • स्वयंचलित ट्रान्समिशन यंत्रणा असल्याने ड्रायव्हरला क्लचचा वापर करण्याची आवश्यकता नाही.
  • बसेसचे दोन्ही दरवाजे रुंद
  • पहिल्या पायरीची उंची कमी व रुंदी जास्त असल्यामुळे प्रवाशांना चढ-उतार सोपे
  • हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या क्षमतेची ब्लोअर सिस्टिम
  • चालकासाठी त्याच्या आसनावरील छताकडे ब्लोअर
  • आरामदायी प्रवासासाठी दोन आसनांमध्ये जास्त अंतर